28/10/2025
अवंतिकाबाईंनी आज त्यांच्या सुनेला अक्षताला, बाहेर भेटायला बोलावलं होतं. अमुक अमुक ठिकाणी, ह्या ह्या वेळी... बस्स. बाकी कशासाठी, काय काम आहे... वगैरे काहीही बोलल्या नव्हत्या त्या. अक्षताही अर्थातच, खोलात न शिरता तयार झालेली. प्रचंड लाडक्या होत्या त्या दोघी, एकमेकींच्या. अगदी अक्षताचं लग्न झाल्यापासूनच, अवंतिकाबाईंच्या एकुलत्या एक मुलाशी... अक्षयशी. माय - लेकीचंच नातं होतं दोघींत, जरी एकमेकींपासून तासाभराच्या अंतरावर रहात होत्या त्या आता.
तर अवंतिका बाई बरोब्बर पावणे अकराला, आपल्या घरुन निघाल्या. तत्पुर्वी त्यांनी भिंतीवरील फोटोतील... आपल्या मिस्टरांकडे बघत, त्यांची माफी मागितली... त्यांना हात जोडले, अन् बाहेर पडल्या त्या. साडेअकरा वाजता अवंतिकाबाई, बरोब्बर ठरलेल्या जागी पोहोचल्या. त्यांनी दुरुनच पाहिलं होतं अक्षताला, आधीच तिथे येऊन थांबलेलं. अवंतिकाबाई अक्षताजवळ गेल्या... अक्षताने वाकून नमस्कार केला त्यांना. अवंतिकाबाईंनी अक्षताच्या गालावर आपला हात ठेवला थोडावेळ, आणि हलकसं हसत मान हलवली त्यांनी.
"कशी आहेस बाळा?"
"मी बरीये आई... तुम्ही कशा आहात?"
"छानेय... आणि बरं का... छानेय असंच म्हणावं गं... बरीये कशाला?"
"----------"
"बरं चल... आपल्याला नरोत्तमदासकडे जायचंय"
"तो ज्वेलर... का हो आई?"
"अगं तू चल तर"
अक्षताचा मुळ स्वभावच, खुसपटं काढत बसण्याचा नव्हता. त्यामुळे सासूबाई चल म्हणाल्यावर, ती त्यांच्यासोबत चालू पडली. नरोत्तमदास ज्वेलर्सच्या दुकानात तुरळक लोकं होती. पण जुनं गिर्हाईक आलेलं बघून, नरोत्तमशेठ स्वतः सामोरं गेले अवंतिकाबाईंना. नमस्कार, चमत्कार झाल्यावर... त्यांना बसायला खुर्च्या दिल्यावर... त्यांच्यासाठी कोकाकोला मागवल्यावर... नरोत्तमशेठनी विचारलं अवंतिकाबाईंना, त्यांच्या येण्याचं प्रयोजन. अवंतिकाबाईनी त्यांची हँडपर्स उघडली, आणि एक मंगळसुत्र काढलं आतून. त्यांचं स्वतःचं मंगळसुत्र. अक्षताने ते लगेच ओळखलं होतं... कारण ते प्रचंड आवडल्याने तिने ही स्वतःसाठी, सेम डिझाईनचं मंगळसुत्र बनवून घेतलं होतं. आईंना मंगळसुत्र पर्समधून काढलेलं बघून, अक्षता आता पुरती भांबावली होती. पण स्वभावानुरुप गप्पच होती ती.
"नरोत्तमभाई... मी बोलले होते ना फोनवर... हेच ते मंगळसुत्र... तुमच्याकडेच केलेलं"
"हा ताई... आपन बनवलेला हर अॅटम आपल्या डोक्यामंदी फिट्ट असते... बोला काय हुकूम"
"हे मंगळसुत्र मोडायचंय... खरंतर काढायचंय"
"म्हंजी?"
"विकायचंय नरोत्तमभाई... तीन तोळे आहे... तुमची घट वगैरे धरुन, आजची किंमत सांगा मला... घाई नाहीये... हे ठेवा तुमच्याकडे... मी फोन करेन"
"ताई तुमीलोग आपले पुराने कस्टंबर हाये... चोखा व्यवहार करनारे... तुमचा हा विकायचा बात फायनल असेल, तर तुमाला करेक्ट भाव सांगते... पन पुन्यांदा इचार करायचा तर करा"
"पुर्ण विचाराअंतीच तुमच्याकडे आलेय मी नरोत्तमभाई... तुम्ही भाव काढा... मी उद्या फोन करेन तुम्हाला... येते मी... जय श्री कृष्ण"
"जय श्री क्रिष्न ताई... आवजो"
अक्षताकडे बघत, 'चल' अशी मान हलवत... अवंतिकाबाई जागेवरुन उठल्या. अक्षताही त्यांच्यापाठोपाठ उठली. दोघी दुकानाबाहेर आल्या.
"आई... अहो प्लिज सांगाल का आता तरी... ते काय होतं?... म्हणजे... तुमचं इतकं प्राणप्रिय मंगळसुत्र, तुम्ही चक्क विकताय?... का हो आई?"
"बर्याच दिवसांत त्या मणीचा, रवा साधा नाही खाल्ला गं... बर्याच दिवसात त्याची, फिल्टर काॅफी ही नाही प्यायलेय... जाऊया?... इथे उन्हात उभ्याने बोलण्यापेक्षा, तिथे बसून बोलूयात... चल"
अक्षता पुन्हा चालू लागली चुपचाप, अवंतिकाबाईंसोबत. आठेक मिनिटांतच त्या दोघी, मणीभुवन मध्ये पोहोचल्या. पंख्याखालचं एक टेबल पकडून बसल्या दोघी. अवंतिकाबाईंनी ग्लासभर पाणी प्यायलं, नी ओढणीच्या एका टोकाने तोंड पुसलं.
"हा बोल बाळा... काय म्हणत होतीस?"
"आई अहो मी काय म्हणणार?... काय बोलणार?... वाट बघतीये फक्त, तुम्ही काही सांगायची"
"तू मला विचारलंस ना, की हे इतकं प्राणप्रिय असलेलं मंगळसुत्र मी का विकतीये?... मला एक सांग ते ज्या व्यक्तीच्या नावाने मी गळ्यात घातलेलं, त्या प्रिय व्यक्तीचे प्राणच राहिले नसतील आता... तरीही मी मात्र हे उराशी कवटाळून बसायचं?"
"अहो आई..."
"एकेक एक मिनिट... मी संपवते आधी... तुझ्या सासरेबुवांसोबत, तीस वर्ष संसार केला मी... आनंदाने... तृप्त होतो, परमसुखी होतो एकमेकांसोबत... पण ते गेले मला सोडून... मला एकटीला मागे टाकून... पाच वर्ष झाली... ढाळले की अश्रू बरेच... हळहळले की त्यांच्या आठवणीत बरीच... पुरे झालं ना... पंच्चावन्नची होते जेव्हा गेले ते... आज साठीची आहे... आणि एकंदर तब्येत बघता, आणिक पंधरा वर्ष कमीतकमी मरत नसते मी... मग आता ही पुढची पंधरा वर्षही मी अशीच अश्रू ढाळत, उर बडवत जगायची?... पाच वर्ष पाळला की शोक... बस्स झालं"
"आई अहो तुम्ही हे काय... आय मीन... हे असं कसं बोलू शकता तुम्ही?"
"का?... काय चुकीचं बोलतीये मी?... मी ठरवलंय अगं पुढे जाण्याचं... तुम्ही कायते मुव्ह आॅन का काय म्हणता ना... ते करायचं"
"मुव्ह आॅन?"
"हो... मी... मी लग्न करायचं ठरवलंय... दोनेक वर्ष झाली, आम्ही ओळखतोय एकमेकांना... आम्ही खूप बोलतो एकमेकांशी... खूप छान व्यक्ती आहे ती... बायको गेलीये... नी एकुलती एक मुलगी आॅस्ट्रेलियाला असते... आम्ही अतिशय मनापासून... आत्यंतिक आत्मियतेने ह्या बंधनात अडकू इच्छितोय... आणि हा निर्णय अंतिम आहे माझा"
"अहो पण बाबा... आय मीन अक्षय..."
"चल निघूया... तू आलीस माझ्याबरोबर खूप बरं वाटलं गं... त्या मंगळसुत्राचे सव्वा लाख जरी आले, तरी बास आहे... आणि खरंतर मी दागिना नाही, तर आठवण मोडीत काढतीये... अगदी ठरवून... त्यातून मिळणारे पैसे हा इतकी वर्ष त्या आठवणीत अडकून राहिल्याचा, मोबदला आहे माझ्यासाठी"
एकीकडे डोसा खात खात, काॅफी पित पित... अगदी सहजपणे इतकं बोलून, अवंतिकाबाई उठल्या नी हाॅटेलबाहेर आल्या. त्यांच्या पाठोपाठ अर्थातच अक्षताही... कंप्लिट भारावलेली. अवंतिकाबाईंनी एका रिक्षेला हात करत ती थांबवली, आणि सायनला येणार का विचारलं. तो हो म्हणाल्यावर, त्यांनी अक्षताकडे पाहिलं... नी तिला हलकीशी मिठी मारली.
"निट जा बाळा... काळजी घे... पोहोचलीस की फोन कर"
"हो आई... तुम्ही ही काळजी घ्या... आणि आई... एक सांगू... आय... आय रिअली अडोअर यू... तुम्ही... तुम्ही ग्रेट आहात हो... खरंच... आय... आय रिअली मीन इट"
आता अक्षताने कडकडून मिठी मारली अवंतिकाबाईंना, आणि भरलेल्या डोळ्यांनीच रिक्षात बसली ती. अवंतिकाबाई पाठमोर्या रिक्शाला हात करत, उभ्या राहील्या तिथेच बराचवेळ.
"हॅलो"
"हॅलो... नमस्कार अवंतिकाताई... मी उमा बोलतीये... अक्षताची आई"
"नमस्कार नमस्कार उमाताई... बोला बोला... कशा आहात?"
"आता छान आहे हो... फक्त तुमच्यामुळे बरं"
"का हो?... असं का म्हणताय?"
"अहो ताई... अक्षता तयार झालीये"
"अरे वा वा... गंगेत घोडं न्हालं म्हणायचं"
"तुमच्यामुळे हो ताई... खरंच पण कसं तयार केलंत हो तिला?... मी आणि हे गेले दोन वर्ष मागे होतो अक्षताच्या, पण दादच देत नव्हती हो"
"मी थेट असं काही बोललेच नाही हो तिच्याशी"
"म्हणजे?"
"अहो म्हणजे... लहान मुलाला भरवतांना बघा, ते काही केल्या तोंड उघडत नसतं... आपलं नानाप्रकारे समजावून होतं, गाणी - गोष्टी म्हणून होतात पण ते ढिम्मच असतं... मग अचानक काहितरी सुचून, आपण एक खोटा घास आपल्या तोंडात टाकतो... जिभेच्या टोकाने एकदा ह्या गालात तर एकदा त्या गालात, असा तो तोंडातल्या तोंडात घोळवल्यासारखं करतो... मग जरा जास्तच तोंड हलवत तो घास, चावत असल्याचं भासवतो... आणि मग आवंढा गिळत जोरात 'हाssss' करत, आ वासतो तोंडाचा... आपलं रिकामं तोंड पाहून, त्या पोराला मग वाटतं आपण सुद्धा जेवलो... मग ते पोर खळखळून हसतं, नी आपल्याकडून घास घेण्यासाठी आ करतं... बस्स... मी ही अगदी हेच केलं... अक्षताला... अक्षताला पुनर्विवाहासाठी फक्त, मानसिकदृष्ट्या तयार केलं मी... तिच्याकडून काहीही वदवून न घेता... बाकी पुढचा निर्णय तिचाच होता, जो तिने तुम्हाला सांगितलाय... एकाच दिवशी, एकाच वेळी सासू अन् सुनेला वैधव्य येणं... हा नियतीचा घाला होता... बाप - लेकाचं कार अॅक्सिडंटमध्ये आॅन द स्पाॅट जाणं, हा त्या दैवाचा क्रूर खेळ होता... ज्याची झळ सोसली की आम्ही दोघींनी, तब्बल पाच वर्ष... माझा संसार निदान तीस वर्ष तरी झाला होता अहो... अक्षय - अक्षताचा तर, तीन वर्षही नव्हता झाला... मग माझ्या मानाने त्या पोरीने तर, फारंच सोसलं हो... म्हणूनच जेव्हा मागल्या आठवड्यात, तुम्ही मला तिचं पुन्हा लग्न लाऊन देण्याबद्दल विचारलंत... मला तर माझ्या पोटच्या लेकीलाच, स्थळ सांगून आल्याचा आनंद झाला होता... आणि ती तुमचं ऐकतच नाहीये कळल्यावर, मग मी ठरवलं प्रयत्न करुन बघायचं... आणि बघा मी पास झाले... पण मी काय सांगितलं नेमकं अक्षताला, ते मात्र विचारु नका बरं मला... हा हा हा"
"बरं... नाही विचारणार... तुम्हालाही अन् अक्षतालाही... पण एक मात्र सांगते... अगदी पोटच्या पोरीसारखीच माया केलीत हो तुम्ही अक्षतावर, सासू असूनही... कन्यादान हे श्रेष्ठ दान समजलं जातं ना?... पण एका सासूने आपल्या वैधव्य आलेल्या सुनेचं केलेलं दान, त्याही पेक्षा कितीतरी पटीने श्रेष्ठ आहे अवंतिकाताई"
अवंतिकाबाईंनी फोन ठेवला. वाहणारे डोळे त्या पुसतच होत्या, की दारावरची बेल वाजली. एक माणूस उभा होता दारात.
"नरोत्तमसेठने ये आपका मंगलसुत्र, आपको देनेको बोला है मॅडम... आप उनको प्लिज फोन करके बताओ, मंगलसुत्र मिला करके"
"थँक्यू... मै फोन करुंगी उनको"
दार लावत... डबी उपडी करत आपलं मंगळसुत्र, तळहातावर घेतलं अवंतिकाबाईंनी. छातीशी घट्ट कवटाळून घेत ते, डोळे मिटून उभ्या राहिल्या त्या. काहीवेळाने डोळे उघडत, मिस्टरांच्या फोटोकडे बघून बोलल्या त्या...
"दोन दिवस स्वतःपासून दूर ठेवणार होते मंगळसुत्र ठरवूनच... म्हणून माफी मागितलेली हो तुमची, त्या दिवशी घरुन निघतांना"
त्यानंतर मिस्टरांच्या फोटोशेजारीच असलेल्या, आपल्या लेकाच्या फोटोकडे पहात बोलल्या त्या...
"तू ही मला माफ कर रे राजा... तुझी बायको मी पळवली तुझ्याकडून... पण तिच्यादृष्टीने हेच अतिशय योग्य होतं रे... आपल्या छातीवर दगड ठेवत, सुनेचं 'दान' केलंय मी... आणि खात्री बाळग, ते 'दान' फुकट जात नाहीये ना... याची आमरण काळजी घेईन मी... तू निश्चिंत रहा.
---सचिन देशपांडे