19/11/2015
ऑनलाईन ठिबक सिंचन प्रक्रिया थांबली
मुदतवाढ मिळाली तर प्रस्ताव स्वीकारू
जाफराबाद : राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान आणि आताच नव्याने बदल करण्यात आलेल्या पंतप्रधान कृषी सुक्ष्म सिंचन योजनेंतर्गत शेतकर्यांना शेती पिकासाठी देण्यात येणार्या ठिबक सिंचन अनुदान योजनेची इच्छुक शेतकर्यांकरीता ऑनलाईन अर्ज मागवून पन्नास टक्के अनुदानावर देण्यात येत होती. मात्र, ही प्रक्रिया १५ नोव्हेंबरपासून बंद करण्यात आल्याने शेतकर्यांची चिंता वाढली आहे.
कमी पाऊस, दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने रबी हंगाम धोक्यात आला आहे. त्यामुळे आहे त्या पाण्यात रबी हंगामात पिके घेऊ इच्छिणार्या शेतकर्यांना आता याचा लाभ घेता येणार नाही. तालुका व जिल्हा कृषी कार्यालय यांच्यामार्फत ठिबक व तुषार संचाकरीता अनुदान मिळत असल्याने अनेक शेतकरी याचा फायदा घेण्याकरीता इच्छूक आहेत. ही एक शासनाची शेतकर्यांच्या हिताची योजना आहे. तरी सुद्धा शेतकर्यांचे हित वेळ, काळ, परिस्थिती न बघता सर्वच प्रक्रिया थांबविण्यात आली आहे.
दुष्काळी परिस्थितीमध्ये शेतकरी आर्थिक अडचणीमध्ये आला आहे. अशावेळी किमान अर्धे पैसे भरून संच खरेदी करेल, अशी अपेक्षा व्यक्त करीत असताना शेतकर्यांसोबत व्यापारीदेखील अडचणीमध्ये सापडले आहे. शेतकर्यांकरीता नैसर्गिक आपत्तीमध्ये बदल होऊन काम करावेच लागते. परंतु शासनाच्या अशा परिस्थितीमध्ये नियमामध्ये बदल होऊ शकत नाही, अशी खंत शेतकरी व्यक्त करीत आहे. सिंचन क्षेत्र वाढीसाठी आणि कमी पाण्यात जास्त उत्पन्न शेतकर्यांना घेता यावे, यासाठी केंद्र शासन अनुदानाच्या रूपाने मदत करत असते. मिळणारी मदत ही वेळेत मिळत नाही.
मागील आर्थिक वर्षातील प्रस्ताव दाखल होऊन अद्याप काही शेतकर्यांना लाभ मिळाला नाही. या वर्षात देखील सिंचन योजनेचा लाभ घेण्यासाठी हजारपेक्षा अधिक शेतकरी ऑनलाईन नोंदणी केली आहे. काही नोंदणी करण्याचे बाकी आहे. ऑनलाईन नोंदणी झाल्यानंतर एक महिन्याच्या आत लाभार्थ्यांना अनुदान मिळायला पाहिजे. परंतु तसे होत नाही. यासाठी लागणारी तरतूद देखील उपलब्ध आहे, असे सांगण्यात येते. प्रत्यक्ष अनुदान मात्र वेळेत मिळत नाही. मागील व चालू सिंचन अनुदान तात्काळ वाटप करून थांबलेली प्रक्रिया पुन्हा सुरू करावी, अशी मागणी शेतकर्यांतून होत आहे. ■ सिंचन योजना ऑनलाईन अर्ज करण्यासंदर्भात शेतकर्यांना एक महिन्याची मुदत देण्यात आली होती. मुदत संपल्याने साईड बंद होऊन यावर शासनाच्या निर्णय अपेक्षित आहे. मुदतवाढ मिळाली तर परत प्रस्ताव स्वीकारू, अनुदान वाटपाबाबत टप्प्याटप्प्याने प्रक्रिया सुरू आहे. वरिष्ठांकडून जसा निधी उपलब्ध झाला त्याप्रमाणे अनुदान वाटपाचा काम सुरू आहे, असे तालुका कृषी अधिकारी सुर्यकांत सांगावे यांनी सांगितले.