17/05/2020
"नाशिकची मिसळ थाळी"
माझी आजची पोस्ट खास मिसळ प्रेमींसाठी.........
मिसळ ही बऱ्याच ठिकाणची फेमस आहे. पुणेरी मिसळ, कोल्हापुरी मिसळ पण नाशिकच्या मिसळची बात काही औरच....... नाशिकमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने मिसळ बनवली जाते. कधी मिसळ मध्ये पोहे घालून दिले जातात. तर कधी साबुदाण्याची खिचडी घालून मिसळ दिली जाते. आज आपण मिसळ थाळीची मजा घेणार आहोत. पण थोड्या वेगळ्या पद्धतीने....
मिसळ हा सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचा विषय आहे मग ती मिसळ कुठलीही असू दे...... चला तर मग बघुया........ "नाशिकची मिसळ थाळी" 😊
नाशिकची मिसळ म्हटली की त्यामध्ये मोड आलेली मटकी हा सर्वात महत्त्वाचा घटक मिसळची राणीच म्हणा ना हवं तर !!!! मोड आलेली मटकी थोडेसे हिंग, हळद, मीठ घालून कुकर मध्ये पूरेसे पाणी घालून एका शिट्टीत शिजवून घेतली.
मिसळ ची खरी चव... ती म्हणजे चमचमीत तर्रीदार रस्सा....... जसे आपण मोड आलेल्या मटकीला मिसळची राणी म्हटले, त्याचप्रमाणे मिसळचा चमचमीत रस्सा याला मिसळचा राजा म्हणायला काहीच हरकत नाही.
तर मग हा तर्रीदार मिसळचा चमचमीत रस्सा बनतो तरी कसा?? बघूया तर.....
सर्वप्रथम त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, लसूण, अद्रक, किसलेले सुके खोबरे, रंग खुलवण्यासाठी वापरलेल्या बेडगी मिरच्या आणि त्यांच्या चवीत झणझणीत पणा आणणारे खडे मसाले तर हया खडे मसाल्यात मिरे दादा, वेलची ताई, लवंग दादा तर तेजपान भाऊ पण आले. दालचिनी ताई पण आल्या. तर आपण या मध्ये या सर्व दादांना व ताईंना कामाला लावणार आहोत. कामाला लावणार आहोत म्हणजे नेमकं काय करणार आहोत?? चला तर मग बघुया...........हे सर्व खडे मसाले,कांदा, किसलेले खोबरे, लसूण,अद्रक कढई मध्ये घालून मध्यम आचेवर न करपता चांगले खरपूस भाजून घ्यायचे. खरपूस भाजून झालेले सर्व मिश्रण मिक्सर मध्ये बारीक वाटून घ्यावे. आजीचा पाटा-वरवंटा असल्यास उत्तम....... पण........ हल्ली आजीच्या पाटा-वरवंट्याची जागा मिक्सर मामांनी घेतली ना......असो........सर्व मसाला व्यवस्थित बारीक वाटून झाला कि, जाड बुडाच्या पातेल्यात पुरेसे तेल घालून मस्त तेल सुटेपर्यंत मध्यम आचेवर मसाला छान शिजवून घ्यावा. मसाला व्यवस्थित शिजला की त्यानंतर त्यामध्ये लाल तिखट, हळद,धना पावडर, व चवीपुरते मीठ घालावे. नंतर पुरेसे गरम पाणी घालुन एक उकळी येऊ द्यावी. गरम पाणीच घालावेत्याने काय होते की..... आपल्या तर्री ताई या लवकर दिसायला लागतात. तर्री ताई दिसायला लागल्या की,......त्यांना एका पातेल्यात विराजमान करून घ्यावे. रस्सा दादांना अजून थोडे उकळू द्यावे....... व्यवस्थित उकळल्यानंतर गॅस बंद करावा.
अशा पद्धतीने मिसळच्या चवीमध्ये भर घालण्यासाठी तर्रीदार रस्सा तयार !!!!
आता पाव या आपल्या विदेशी दादांकडे येऊयात.... पाव दादांना देशी गाईच्या तुपात थोडेसे शेकून घेऊयात.... नंतर एका मोठ्या थाळीमध्ये, त्या मधल्या छोट्या प्लेटमध्ये शिजवलेली मटकी व तर्रीदार रस्सा एकत्र करून त्यावर बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, शेव घालून,लिंबू पिळून तुपावर शेकलेल्या पाव दादांसोबत मिसळ चा आस्वाद घेऊयात. मिसळ तिखट लागल्यास जोडीला दही हे आहेच... दही मातीच्या भांड्यात जमवलेले उत्तम .....आणि जोडीला भाजलेला पापड ही आहेच... आणि सर्वात शेवटी.... लास्ट बट नॉट द लिस्ट..... एक चमचा दही, एक पेला भरून पाणी,काळे मीठ, जिरेपूड सर्व एकत्र करून घुसळून घेतलेले "मसाला ताक"....... शरीरासाठी उत्तम असे पेय .......... तुमची पचनशक्ती वाढवण्यासाठी मदत करेलच की...... अशा पद्धतीने तयार आहे...... भरपूर प्रेम व वेगवेगळ्या चवींनी परिपूर्ण अशी "नाशिकची मिसळ थाळी" 😊अनेक अश्या मिसळ प्रेमींसाठी............😊